पाचेगाव : कोरोना महामारीच्या काळात अन्य आजाराने पीडित असणाऱ्या रुग्णांचे होत असलेले हाल पाहता वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलेल्या नेवासा तालुक्यातील गोणेगाव येथील एकाच कुटुंबातील दोन भावंडांनी गावी येत या रुग्णांना मोफत औषधे देऊन रुग्णांची सेवा केली.
गोणेगाव येथील असणारे डॉ. रमीज पटेल व डॉ. अझहर पटेल अशी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलेल्या एकाच कुटुंबातील दोघांची नावे आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने गावात कोणत्याच प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांना पाचेगाव, खुपटी आदी गावांत जावे लागते. त्यामुळे या दोघांनी गावात जाऊन रुग्णांना असणाऱ्या साधारण आजारांवर सिमथेमॅटिक, अँटिबायोटिक आदी १५ प्रकारची औषधे मोफत देऊन गावातील रुग्णांवर दोन दिवस मोफत आरोग्यसेवा केली.
रुग्णांमध्ये वृद्धांची संख्या अधिक आणि घराबाहेर पडल्याने कोरोनाचा धोका असल्याने गावातच सेवा मिळावी, ह्या हेतूने या दोन भावांनी स्वतःच्या पैशांतून या रुग्णांवर दोन दिवस वैद्यकीय उपचार केले.
दरवर्षी रमजान महिन्यात उपवास करणाऱ्या बांधवांना आम्ही जेवण देत असतो. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे आपण यावर्षी रुग्णांना गावातच मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. अझहर पटेल यांनी सांगितले.
यावेळी गोणेगावचे माजी सरपंच दिनकरराव काळे, तंटामुक्ती अध्यक्ष करीमभाई पटेल, सामाजिक कार्यकर्ते बाबूभाई शेख उपस्थित होते.
---
०५ गोणेगाव
गोणेगाव येथे रुग्णांना औषधे देताना डॉ. पटेल.