नेवासा : नेवासा -नेवासा फाटा रोडवरील पावन गणपती मंदिर प्रांगणात असलेले झाड रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक रस्त्यावरच पडल्याने सुमारे अर्धातास वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.युवकांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे झाड दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नेवासा -नेवासा फाटा रोडवरील श्री पावन गणपती मंदिर प्रांगणात लावलेले सुमारे तीस ते चाळीस फूट उंचीचे सुबाभळीचे झाड अचानक रस्त्यावरच कोसळल्याने पूर्ण रस्ताच बंद झाला.वृक्षाची लांबी मोठी असल्याने वाहने पुढे जात नव्हती त्यातच पहाता पहाता नेवासाफाटा येथून नेवासा शहराकडे जाणारी तर नेवासा येथून फाट्याकडे जाणारी वाहने यामुळे अडकून पडली त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली.
दरम्यान या भागातील युवक झाडाला बाजूला करण्यासाठी पुढे आले त्यांनी हे झाड केले.त्यामुळे अर्धा तास उभी असलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला.मंदिर प्रांगणात युवकांसह भक्त मंडळींनी वृक्षरोपणाद्वारे हे झाड लावलेले होते.मात्र सतत होणारा पाऊस व वादळ यामुळे ते झाड वाकले होते.रविवारी अचानक ते मुळासकट उघडून पडल्याने वाहन चालकांची एकच धांदल उडाली मात्र युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून रस्त्यात पडलेले झाड दूर करून वाहतूक सुरळीत केल्याने अनेकांनी या भागातील युवकांचे कौतुक केले.