राजूर : दोन बिबट्यांच्या झालेल्या झुंजीत दोन्ही बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील लहित शिवारात रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली.
अकोले वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री एकच्या सुमारास लहित शिवारातील एका उसाच्या क्षेत्रात एक सात ते आठ महिन्यांचा मादी व एक ते सव्वावर्षाचा नर यांच्यात झुंज सुरू होती. यावेळी त्यांच्या डरकाळ्या फोडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे जागे झाले. मात्र, समोर जाण्यास कोणीही तयार झाले नाही. यावेळी इतरही एक बिबट्या त्या ठिकाणी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सोमवारी सकाळी शेजारील लोकांना हे दोन्ही बिबटे मृत झाल्याचे आढळून आले. ही माहिती तेथील लोकांनी अकोले वनविभागाला कळविली. घटनेची माहिती मिळताच अकोल्याच्या वनक्षेत्रपाल भाग्यश्री पोले यांनी ही माहिती उपविभागीय वनाधिकारी जी. ए. झोळे यांना दिली.
उपविभागीय वनाधिकारी झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पोले, वनरक्षक विजय जावळे, वनपाल घोडसरे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची प्राथमिक माहिती तेथील स्थानिकांकडून घेत या दोन्ही बिबट्यांचा पंचनामा केला.
....
बिबट्यांच्या अंगावर जखमा
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन केले. यात या दोन्ही बिबट्यांच्या अंगावर जखमा झाल्या असल्याचे दिसून आले. शवविच्छेदनानंतर त्यांचे काही नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल पोले यांनी सांगितले.
..
फोटो-१८राजूर बिबट्या १
१८राजूर बिबट्या २
...
ओळी-अकोले तालुक्यातील लहित येथे झुंजीत ठार झालेल्या बिबट्यांचा पंचनामा करताना वनक्षेत्रपाल पोले, वनरक्षक विजय जावळे, वनपाल घोडसरे आदी.