अकोले : ''''विकेल ते पिकेल'''' या तत्त्वावर आदिवासी भागात प्रथमच काळीमिरी, जायफळ, दालचिनी, चारोळीसारखे मसाले पिके तसेच सफेद मुसळी, जांभळा भात, दिवाळी तूर, खपल्या गहू अशी पिके घेण्यास सुरुवात झाली आहे. मार्केट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्यास शेती निश्चित किफायतशीर होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
हरिश्चंद्रगडाच्या कुशीत तयार होत असलेल्या मसाले पिकाचा ब्रँड राज्यभर लौकिकला जावा, यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे व तालुका कृषी विभाग प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धामणवन-शिरपुंजे भागात आदिवासी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या निळ्या-जांभळ्या सेंद्रिय भाताची मेहेंदुरी येथील अगस्ती कृषी प्रोड्युसर कंपनीच्यावतीने विक्री व्यवस्था करण्यात आली. कोरोनासंकट काळात तालुक्यातील धामणवन येथील मसाले पीक शेती बहरात अाली. आत्मा अंतर्गत हनुमान शेतकरी गटाने शेतीचे प्रयोग सुरू केले आहेत. २० शेतकऱ्यांनी प्रायोगिक मसाला पीक शेती सुरू केली आहे. तीन वर्षे काळीमिरी उत्पादन सुरू होण्यास लागतात; पण सुनील बारामते यांच्या शेतात एक वर्षांत काळीमिरी फळ लगडले आहे. कोकम, चारोळी, जायफळ, फणस, जांभळा भात, सेंद्रिय चारसूत्री भात, ठिबक भुईमूग, सफेद मुसळी, मत्स्य व मधमाशी पालन अशी बहूअंगी शेती धामणवन येथे शेतकरी गटाने फुलवली आहे. १० शेतकऱ्यांनी सेंद्रिय निळा जांभळा भात पीक घेतले आहे. तालुक्यातील आदिवासी भागात प्रायोगिक तत्त्वावर बारामती येथून आणलेली २७० फणस कलम व आक्रनी-धडगाव नंदुरबार या आदिवासी भागातून ११० चारोळी रोपे आणून शेतकऱ्यांच्या बांधावर लावण्यात आली आहेत.चारोळीचे उत्पादन पाच वर्षांनी सुरू होते. एका झाडापासून २३ किलो चारोळी मिळते. किलोला २ हजार भाव सध्या मिळत असून, एक झाड वर्षाला किमान ४५ हजार रुपये मिळवून देते. ३० शेतकऱ्यांनी रब्बीसाठी प्रथमच उन्हाळी नाचणी रोपवाटिका तयार केल्या आहेत. तर २० शेतकऱ्यांनी उन्हाळी भात पीक घेण्यासाठी रोप टाकले आहे.
दूधमोगरा -
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात डोंगर उतार आणि डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या निचऱ्याची जमिनींवर भात खाचरांची जागा सोडून वरई हे खरिपातील महत्त्वाचे पीक घेतले जाते. दूधमोगरा या वरईच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाने अकोले तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांना भुरळ पाडली आहे. लोंबीची लांबी सुमारे तीस ते पस्तीस सेंटिमीटर एवढी लांब आहे. या वाणाचे हेक्टरी २५ ते २७ क्विंटल उत्पन्न मिळते. जवळपास हे इतर वाणाच्या तुलनेत दुप्पट आहे. चालू हंगामात तालुक्यात सुमारे ७५ एकर क्षेत्रावर या वाणाची लागवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे भारत सरकारच्या राष्ट्रीय वनस्पती जनुकिय संस्थान नवी दिल्ली येथे या वाणाची नोंदणी करण्यात आलेली आहे.