श्रीरामपूर : जवाहरवाडी परिसरात शेती महामंडळाच्या जमिनींवर भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाने केलेली अतिक्रमणे महसूल व पोलीस प्रशासनाने मंगळवारी बळाच्या जोरावर काढून टाकली. याप्रकरणी महामंडळाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस अधिकार्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी भिल्ल समाज संघटनेचे शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ महामंडळाकडील खंडकर्यांच्या जमिनी शेतकर्यांना परत देण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यावरील अतिक्रमणेही काढण्याचा निर्णय झाला. याबाबत काही दिवसांपूर्वी महामंडळाचे अधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी व तहसीलदारांची बैठक होऊन हरेगाव व टिळकनगर मळ्यातील अतिक्रमणे काढण्याचे नियोजन झाले. त्याप्रमाणे १३ मे रोजी जवाहरवाडी परिसरातील भिल्ल समाजाची अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढली. जमिनीची मोजणी व अतिक्रमण काढण्यास विरोध करणारे ढवळे यांच्यासह २८ पुरुष व १० महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशीरा सोडून दिले. आम्ही बेघर झालो असून आमच्याकडे संसारोपयोगी साहित्यच राहिले नसल्याने आम्ही कुठे जायचे? असा प्रश्न करीत त्यांनी पोलीस ठाण्यातच ठाण मांडले. बुधवारी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, महसूल व महामंडळाच्या अधिकार्यांनी चर्चा करुन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. अखेर दुपारी अडीच वाजता अतिक्रमण काढताना पंचनामा करुन ताब्यात घेतलेले सामान १९ मे रोजी ज्या ठिकाणाहून घेतले तेथेच ताब्यात देण्याचे लेखी आश्वासन महामंडळाच्या अधिकार्यांनी दिल्यानंतर पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे, तहसीलदार किशोर कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलीस व महसूल प्रशासनाने मंगळवारी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी भिल्ल समाज व टायगर फोर्सच्या वतीने बेलापूर चौकात रास्तारोको करण्यात आला़ सकाळी ११ वाजता सुरु होणारे रास्तारोको आंदोलन दुपारी ३ वाजता सुरु झाले. भूमिहिन आदिवासींची अतिक्रमणे काढणार्या अधिकार्यांविरुद्ध अॅट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करावेत, अतिक्रमण होते, त्याचठिकाणी जमिनी देण्याची मागणी ढवळे यांनी केली. यावेळी टायगर फोर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र भालेराव, अनिल जाधव, सुभाष मोरे,राजेंद्र माळी, रमानाथ माळी, बाळासाहेब निकम, अनिल मोरे, देवकाबाई बर्डे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. (प्रतिनिधी)
आदिवासींचा रास्तारोको
By admin | Published: May 14, 2014 11:31 PM