राजूर : मोबाइल नेटवर्किंग नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील कुमशेत येथील सुमारे ८० हून अधिक विद्यार्थ्यांना जिकडेतिकडे गवत आणि झाडेझुडपे वाढलेल्या आणि पावसाने ओल्याचिंब झालेल्या डोंगरवाटा तुडविण्याची वेळ आली आहे. शिक्षण विभाग अशा वंचित विद्यार्थ्यांसाठी काय उपाययोजना करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. आपला पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी शेतकरी पालकांनी पदरमोड करत मुलाला अँड्रॉइड मोबाइल घेऊन दिला. मोबाइल मुलांच्या हातात मिळाला. आता आपला अभ्यास सुरू होणार, या आनंदात असणाऱ्या मुलांचा आदिवासी पट्ट्यातील बहुतांश गावांमध्ये मोबाइल नेटवर्किंग उपलब्ध नसल्याने हिरमोड तर झालाच; पण याबरोबरच डोंगरवाटा झिजविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे शिक्षण या विद्यार्थ्यांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा झाले आहे. नेटवर्क मिळविण्यासाठी या विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून दूर असणाऱ्या डोंगराचा किंवा टेकडीचा आधार घ्यावा लागत आहे.
भर उन्हाळ्यात डोंगरावरील झाडाखाली बसून ही मुले शिक्षण प्रणाली आत्मसात करत होती. मात्र, आता पावसाळा सुरू झाला आहे. या पट्ट्यात पावसाचे प्रमाणही अधिक असते. डोंगररांगा आणि टेकड्यांवर हिरवेगार गवत व झुडपे यांची झपाट्याने वाढ होत आहे. ओढे, नाले प्रवाही होत आहेत. अशा परिस्थितीत या झाडाझुडुपांतून वाट शोधत ही मुले गावापासून दूर पाच सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्या आणि डोंगर वाटा तुडवत आहेत. त्यातच या पायवाटाही आता ओल्याचिंब झाल्या आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही आता वाढणार आहे. अशाही परिस्थितीत कुमशेत येथील पाचवीपासून ते महाविद्यालयालयीन मुले समूह करून टेकड्यांवर जात आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहेत.
---------
शासनाने ऑनलाइन शिक्षणाची जी प्रणाली सुरू केली ती आमच्यासाठी अडचणीची ठरत आहे. आदिवासी भागातील भौगोलिक स्थिती शहरी भागांच्या तुलनेत भिन्न आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये मोबाइलला नेटवर्क नाही. आता पावसाळ्यात सगळीकडे पाऊस पडत आहे, अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणापासून मुले वंचित राहणार आहेत.
- सयाजी असवले, सरपंच, कुमशेत
-----------
आमचे शिक्षण पूर्ण होणार का?
सकाळी उठून दररोज डोंगरावर जायचे, तेथेही रेंज मिळविण्यासाठी इकडेतिकडे फिरायचे, दोन तास फिरले तर अर्धा तास रेंज मिळते तोपर्यंत दोन तीन मुद्दे निघून जातात. तेव्हा आमचे शिक्षण पूर्ण होणार का, असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला असल्याचे महाविद्यालयात अखेरच्या वर्गात शिकत असलेल्या मनीषा असवले हिने सांगितले.