केडगाव : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या कडेला राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या पालांमध्ये पाणीच पाणी झाले होते. तेथील वास्तव परिस्थितीचे ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच अधिकारी, पदाधिकारी खडबडून जागे झाले. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तलावास नुकतीच भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तलावाशेजारी असणाऱ्या सरकारी जागेची माहिती संकलित करून तत्काळ आदिवासींच्या घरकुलासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहे. तसेच घरकुल मंजूर होईपर्यंत येथील आदिवासींची पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले.
प्रशासनाच्या वतीने आदिवासींच्या घरकुलाचा प्रस्ताव बनविण्यासाठी हालचालींना वेग आला असून तलावातील आदिवासींची तात्पुरती निवासाची व्यवस्था आढाववाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये करण्यात येणार आहे. तसेच आदिवासींना अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती रघुनाथ झिने, रोहिदास कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे भटक्या विमुक्त जाती जमातीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय डोकडे, मंडळाधिकारी वृषाली करोसिया, जेऊर तलाठी सुदर्शन साळवे, पिंपळगाव तलाठी अक्षय खरपुडे, उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर उपस्थित होते.
----- पिंपळगाव तलावातील आदिवासी समाजाच्या तसेच तालुक्यातील भटक्या-विमुक्तांना न्याय देण्यासाठी मंत्री तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे. पिंपळगाव तलावातील आदिवासी कुटुंबीयांची परिस्थिती गंभीर बनली असून त्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने आदिवासी समाजामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
-दत्तात्रेय डोकडे,
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती
----
महापालिकेच्या प्रकल्पाला होणार विरोध
पिंपळगाव तलावाचे ७०० एकर क्षेत्र महानगरपालिकेच्या नावावर करण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने येथे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, तलावातील आदिवासींचे पुनर्वसन झाल्याशिवाय येथे कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका आदिवासी समाजाकडून घेण्यात आली आहे.
----
...अन् चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवर हास्य
तनपुरे यांनी आदिवासी कुटुंबीयांना घरकुल देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश प्रशासनास दिले. त्यानंतर आपल्याला नवीन घर मिळणार, याची माहिती चिमुकल्यांना समजताच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलल्याचे दिसून आले.
----