अहमदनगर : पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील तृप्ती तुपे खून प्रकरणावर जिल्हा न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली़ सुनावणीसाठी अॅड़ उज्ज्वल निकम उपस्थित होते़ त्यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली़ याप्रकरणी उद्या शनिवारी सुनावणी होणार आहे़ सुनावणीदरम्यान दोन साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या़ प्रथम साक्षीदार गणी पठाण यांनी आरोपी संतोष लोणकर घटनेनंतर आपणास भेटला होता़ तो जाम खूश होता़ त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर घटना सांगितली़ तसेच तृप्तीने कडाडून विरोध केला़ त्यामुळे तिला नाकात चिखल कोंबून ठार केल्याची कबुली संतोष याने दिली़ दुसरा साक्षीदार अमोल तुपे यांनी तृप्तीच्या काकांना आरोपी दिसल्याचे सांगितले होते, अशी साक्ष दिली आहे़ वरील दोन्ही साक्षीदारांची आरोपीच्या वकिलांनी उलट तपासणी घेतली असून, याप्रकरणी उद्या शनिवारी पुन्हा न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे़ अळकुटी येथील दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती ही आपल्या लोणी मावळा येथील घरी जात असताना तिघा नराधामांनी तिचा खून केल्याची घटना दोन वर्षापूर्वी घडली होती़ त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता संतोष लोणकर, सुनील लोणकर आणि विहिरीवर खोदकाम करणारा दत्ता शिंदे यांनी अत्याचार करून तिचा खून केल्याचे उघड झाले होते़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी केली होती़ त्यावर तत्कालीन गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी जलदगती न्यायालयात खटला चालविण्याचा निर्णय घेतला़ याशिवाय निकम यांनाही खटला चालविण्याची विनंती केली होती़ त्यानुसार तृप्ती तुपे खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयातील सुनावणीच्यावेळी निकम उपस्थित होते.
तृप्ती तुपे खून प्रकरणी सुनावणी
By admin | Published: April 29, 2016 11:21 PM