भाऊसाहेब येवले राहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणात मासेमारीसाठी विष कालविले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर या प्रकाराची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेत त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. मुळा धरणातील विषप्रयोग निदर्शनास आल्यानंतर राज्यातील इतरही धरणांमधील पाणी साठ्यांमध्ये असा विषप्रयोग होऊ नये, यासाठी राज्य पातळीवरील धोरणच ठरविण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी झालेल्या बैठकीत मुळा धरण प्रकरणाची दखल घेण्यात आली. विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे यांच्या सूचनेवरून मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत प्रधान सचिव अनिल डिकीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. विखे यांनी बैठकीत गांभीर्याने विषय मांडतांना सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील मुळा हे सर्वात मोठे धरण आहे. त्याचा २५ लाख लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात़ मुळा धरणातील मासेमारीमुळे माशांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ धरणात आंतरराष्ट्रीय पध्दतीच्या मासेमारी तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज विखे यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, धरणातील पाणी साठा शुध्द राहिला पाहिजे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल़ धरणातील पाणी दूषित करणे हा गंभीर गुन्हा आहे़ स्पेशल टास्क फोर्सव्दारे कारवाई केली जाईल. राज्यातही मुळा धरणाचा पॅटर्न राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.मुळा धरणात मासेमारीसाठी विषप्रयोग होत असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत कारवाईचा आदेश दिला होता. त्यानुसार बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून धरण परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.