राहुरी पोलीस ठाण्यात श्रीधर सोनवणे (रा. एकलहरे ता. श्रीरामपूर) या ट्रकचालकाने तक्रार दाखल केली आहे. श्रीधर सोनवणे यांच्या तक्रारीनुसार ते श्रीरामपूर येथून भंगार गाडीत टाकून ते केडगाव (नगर) येथे जात होते. दरम्यान, राहुरी परिसरातील नगर- मनमाड रस्त्यावरील लुटमारीचे ठिकाण बनलेल्या धर्माडी विश्रामगृह परिसरात चार जणांनी चारचाकी वाहनातून येत ट्रकचालकाला थांबविले. वाहन चालक श्रीधर सोनवणे यांच्या ताब्यातील चारचाकी वाहन घेत संबंधितांनी वरवंडी (मुळा डॅम) ता. राहुरीच्या दिशेने गेले. भंगाराने भरलेला ट्रक संबंधितांनी चोरून नेल्यानंतर वाहन चालक सोनवणे हे पायी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये भंगाराने भरलेला ट्रक चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चारचाकी वाहनामध्ये आलेल्या त्या चौघांना आपण ओळखले नसल्याचे वाहन चालकाने पोलिसांना सांगितले. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.
राहुरीत भंगार घेऊन जाणारा ट्रक पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:17 AM