शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: धावत्या कारवर ट्रक उलटून झालेल्या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू होऊन एक महिला जखमी झाली. मयतांमध्ये दोन वर्षाची मुलगी, एक महिला आणि दोन पुरुषाचा समावेश आहे, हे सर्वजण अकोले (जि. अहमदनगर) येथील रहिवासी होते. हा अपघात रविवारी (दि. १७) संध्याकाळी ८ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर नाशिक लेनवर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावच्या शिवारात घडला.
ओजस्वी धारणकर (वय २), आशा सुनील धारणकर (वय ४२), सुनील धारणकर (वय ६५), अभय सुरेश विसाळ (वय ४८) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. अस्मिता अभय विसाळ असे जखमी महिलेचे नाव आहे. कारमधून पाच जण प्रवास करत होते. ट्रक आणि कार ही दोन्ही अपघातग्रस्त वाहने पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात होती. चंदनापुरी गावच्या शिवारात धावता आयशर ट्रक बाजूने चाललेल्या कारवर उलटला. हा अपघात इतका भीषण होता, या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
नाशिक-पुणे महामार्गावर पडले पाईप
कार (एम.एच. १७, ए.जे. २६९६) आणि ट्रक (यूपी. २४, टी. ८५५०) या दोन वाहनांचा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रकमधून लोखंडी पाईप वाहून नेण्यात येत होते. अपघातानंतर ट्रकमधील अनेक पाईप नाशिक-पुणे महामार्गावर पडले होते. ट्रकचालक ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडल्याची परिसरात चर्चा आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. हा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती घेत असल्याचे संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
ओजस्वी धारणकर, आशा सुनील धारणकर, सुनील धारणकर, अभय सुरेश विसाळ हे सर्वजण अकोले शहरातील मुख्य पेठ येथील रहिवासी आहेत. धारणकर आणि विसाळ कुटुंबीय हे पुणे येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे गेले होते. ते पुन्हा येत असताना हा अपघात घडला. अपघाग्रस्त वाहनाच्या पाठीमागे मयत अभय विसाळ यांच्या भावाचे वाहन होते. अपघात घडल्यानंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, वाहतूक कोंडी कशामुळे झाली. हे पाहण्यासाठी मयत अभय विसाळ यांचे भाऊ गेले असता भावाच्याच वाहनाचा अपघात घडल्याचे त्यांना दिसून आले. अपघातात मयत झालेल्या अभय विसाळ यांचे अकोले शहरात अगस्ती कमानीजवळ कचोरी-भेळीचे प्रसिद्ध दुकान आहे. विसाळ आणि धारणकर कुटुंबीयांची घरे जवळ-जवळच आहे. मयत अभय विसाळ हे अकोले शहरातील अजिंक्य क्रिकेट क्लबचे सदस्य आणि अष्टपैलू खेळाडू होते.
मृत्युला जणू बोलावले अभय विसाळ हे शनिवारी एका नातेवाईकांच्या मुलाच्या मुंजी साठी शनिवारी पुण्यात आले होते. रविवारी ते परत जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आले होते. त्यांना धारणकर या मित्राचा फोन आला आम्ही नाशिकला चाललो आहे, तुम्ही या म्हंटल्यावर बस मधून उतरून ते कार ने गेले, अन् पुढे हा अपघात झाला, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले