नगरशिर्डी पोलिसांनी बंदीची नोटीस पाठवलेली असतानाही शिर्डीकडे निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे-अहमदनगर मार्गावरील सुपे टोल नाक्यावर तृप्ती देसाई यांचा ताफा पोलिसांनी अडवला.
शिर्डीच्या १०० किमी आधीच पोलिसांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी तृप्ती देसाई समर्थक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. "आम्ही आमच्या हक्काने अधिकारासाठी लढत आहोत. आज मानवी हक्क दिन आहे आणि त्याच दिवशी आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय हे दुर्दैवी आहे", असं तृप्ती देसाई म्हणाल्या. याशिवाय, "नगर पंचायतीच्या आदेशानुसार पोलिसांनी जर मला शिर्डीत बंदीची नोटीस धाडली आहे. तर पोलिसांशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मी इथंच थांबून त्यांनी माझ्या सहकाऱ्यांना शिर्डीत जाऊ द्यावं", असंही त्या पुढे म्हणाल्या.
पोलिसांनी यावेळी तृप्ती देसाई यांचा ताफा अडविण्यासाठी याआधीच पूर्वतयारी केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव तृप्ती देसाई यांना सुपे टोलनाक्यावरच अडविण्यासाठी सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा टोल नाक्यावर तैनात करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?"साई मंदिरात येताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये", असे आवाहन साई संस्थान केले आहे. यावर आक्षेप घेत तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. साई संस्थानने मंदिर परिसरात पेहरावा संबंधिच्या नियमाचे फलक लावले आहेत. देसाई यांनी साई संस्थानने लावलेले हे फलक हटविण्याची मागणी केली आहे. साई संस्थानने फलक काढला नाही, तर आपण स्वत: जाऊन फलक हटविण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी तृप्ती देसाई यांना सुरक्षेच्या कारणास्तव ८ ते ११ डिसेंबरमध्ये शिर्डीत प्रवेश बंदीची नोटीस पाठवली होती. तृप्ती देसाई यांनी पोलिसांची नोटीस धुडकावून लावत आज शिर्डीत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं.