श्रीगोंदा : दौंड-नगर लोहमार्गावर बेलवंडी रेल्वे स्टेशनजवळ ‘आउटर’वर थांबलेल्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेले. रविवारी (दि.११) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महिलांनी आरडाओरड केल्याने रेल्वे लुटीचा प्रयत्न फसला. रेल्वेतील प्रवाशांना त्रास देण्याची याच भागातील ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे.याबाबत रेल्वे पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, कोल्हापूर येथून गोंदियाकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस दौंड-मनमाड रेल्वेमार्गाने जात होती. पहाटेच्या सुमारास ही गाडी बेलवंडी रेल्वे स्टेशनवर थांबली. सिग्नल नसल्यामुळे मुख्य मार्गालगतच्या ‘आउटर’वर गाडी थांबलेली होती. पहाटेची वेळ असल्याने प्रवासी झोपलेले होते. चालक सिग्नलची वाट पाहत असताना काही चोरट्यांनी थांबलेल्या रेल्वेतील जनरल डब्यात खिडकीच्या बाजूने बसलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले.दागिने ओरबडल्यामुळे महिलांना जाग आली. त्यांनी आरडाओरड करताच चोरटे पसार झाले. काही वेळानंतर सिग्नल मिळताच रेल्वे मार्गस्थ झाली.महाराष्ट्र एक्स्प्रेस नगरला पोहोचल्यानंतर दोन महिलांनी रेल्वे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र लांबविल्याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पालवे करीत आहेत. रेल्वे पोलिसांनी बेलवंडी रेल्वे स्टेशन येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.चार दिवसांपूर्वी निजामाबाद पॅसेंजरवर दगडफेकयापूर्वी बुधवारी (दि.७) संध्याकाळीही सहा वाजता पुणे-निजामाबाद पॅसेंजरवर चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत पल्लवी अशोक नंदगिरीवार (वय २३, रा. गडचिरोली) ही युवती जखमी झाली. त्यामुळे रेल्वे सुरक्षा पोलिसांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, अन्यथा मोठी घटना घडू शकते.
‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ लुटीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 3:14 PM