अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली असून, मंगळवारी मंगलगेट परिसरात भरणारा बाजार पथकाने उठविला. तसेच सायंकाळी पाईपलाईन रोडवरील भाजीबाजारात भेट देऊन हा बाजारही पथकाने उठविला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. महापालिकेचे अधिकारीही रस्त्यावर उतरले आहेत. मंगलगेट येथील मंगळवार बाजार जुने कपडे, जुने इलेक्ट्रॉनिक साहित्यासाठी जिल्हाभर प्रसिद्ध आहे. नेहमीप्रमाणे मंगलगेट, कोंड्यामामा चौक परिसरातील रस्त्यांवर विक्रेते पथारी टाकून बसले होते. हे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनीही मोठी गर्दी केली होती. महापालिकेच्या भरारी पथकाने या भागाला अचानक भेट देत बाजार बंद करण्याचे आवाहन केले. त्यास विक्रेते व ग्राहकांनीही प्रतिसाद दिला. शहरातील आठवडेबाजार उठविल्यानंतर पथकाने शहरातील ज्या भागात भाजी बाजार भरतात, त्या भागांनाही भेटी दिल्या. पाईपलाईन रोडवरील यशोदानगर येथे भाजी बाजार भरतो. या ठिकाणीही पथकाने अचानक भेट देऊन बाजार बंद केला.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सायंकाळी ८ ते सकाळी ७ या काळात शहरात संचारबंदी लागू करण्याचा आदेश जारी केला. या आदेशाची अंमलबजावणी करत महापालिकेच्या पथकाने शहरात फिरून सर्व दुकाने, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर होणारी गर्दी हटविली. त्यामुळे सोमवारी सायंकाळी शहरातील प्रोफेसर चौक, चितळे रोड, बालिकाश्रम रोड, पाईपलाईन रोड आदी भागातील रस्ते सामसूम झाले होते. धूलिवंदन असूनही, शहरात कुठेही गर्दी नव्हती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
......
सूचना फोटो मेलवर पाठविला आहे.