चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भात शिजविण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर होत असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगर तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अशोक कोकाटे, उपसरपंच शरद पवार, प्रकाश ठोंबरे यांच्याकडे ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शाळेला भेट दिली. यावेळी भात शिजविण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी संबंधितांकडे चौकशी केली असता दोन दिवस अगोदर पाणी भरुन ठेवले असल्याचे सांगण्यात आले. शाळेच्या प्रांगणात शाळा इमारत व मैदानावरील पाणी जाण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने अतिवृष्टीने शाळा आवारात तळे साचले आहे. हेच पाणी प्रांगणातील बोअरमध्ये जात आहे. या पाण्याचा शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी वापर केला जात असावा. विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून वर्गात जावे लागते. या डबक्यामुळे घाणीचे व डासांचे प्रमाण वाढले आहे. डासांमुळे काही विद्यार्थी आजारी पडले आहेत. सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. अशोक कोकाटे, शरद पवार, सेवा संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ससे, माजी सरपंच मच्छिंद्र खडके, ग्रा. पं. सदस्य दिलीप पवार, महेश जगताप, प्रकाश ठोंबरे, संतोष वाडेकर, आनंदा मुटकुळे, सचिन खडके, गजानन कांबळे, बंडू खराडे, देविदास शेळके व ग्रामस्थांना शाळेच्या एका खोलीत २५ गोण्या सिमेंटचे दगड झाल्याचे आढळून आले. शाळेचे पैसे वाया गेले, त्याची भरपाई कोण करणार? याविषयी विचारणा केली असता शिक्षकांनी कानावर हात ठेवले. (वार्ताहर)
भात शिजविण्यासाठी गढूळ पाणी
By admin | Published: June 27, 2016 12:50 AM