पिंपळगाव माळवी : मागील पाच सहा वर्षांपासून सतत दुष्काळाशी सामना करीत असलेल्या नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशीत यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे परिसरातील शेतमळे फुलले आहेत. त्यातच सध्या सुगीचा हंगाम असल्याने शेतात शेतकरी, शेतमजूरांचा गलबलाट असतो तर गावात दुपारच्यावेळी शुकशुकाट असे चित्र असते.
मागील वर्षी आलेल्या कोरोना महामारीमुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी व छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले होते.या सर्व परिस्थितीतून सध्या शेतकरी, छोटे व्यावसायिक सावरत आहेत.
यावर्षी परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे परिसरातील पाझर तलाव, नालाबंडिंग , विहिरी, नाले तुडुंब भरले असल्यामुळे परिसरातील शेती हिरवेगार झाले आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बागायती पिके ऊस, मका, हरभरा, गहू, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो अशी नगदी पिके घेतली आहेत. सध्या ज्वारी, हरभरा काढणीस आलेला आहे. त्यातच मजुरांचा तुटवडा भासल्यामुळे शेतकरी सहकुटुंब शेतात स्वतः राबत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेस गावातील रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. सध्या पिंपळगाव पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड, ऊस खुरपणी, ज्वारी, हरभरा सोंगणी चालू आहे. यामुळे परिसरातील शेतमळे शेतमजुरांनी गजबजले आहेत. ग्राहक नसल्यामुळे गावातील छोटे दुकानदार व्यावसायिक दुपारच्या वेळी दुकाने बंद करतात. सायंकाळनंतर पुन्हा गावातील पेठा गजबजू लागतात.
फोटो दोन
०८ पिंपळगाव माळवी, १
पिंपळगाव माळवी परिसरात सुगीच्या हंगामामुळे दुपारी शेतमळे फुलले दिसतात तर दुसऱ्या छायाचित्रात दुपारी ओस पडलेली गावातील बाजारपेठ. (छायाचित्र : खासेराव साबळे)