पाचेगाव : अहमदनगर येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बैठक संस्थेच्या कार्यालयात बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. सभासदांच्या कायम ठेवींवरील रकमेवर पूर्वीच्या दहा टक्क्यांऐवजी बारा टक्के व्याज देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांनी दिली.
छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचे एक हजार २५० सभासद आहेत. २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जमा असलेल्या ठेवींना दोन टक्के व्याज दरवाढीचा फायदा होणार आहे, तसेच कर्जपोटी भरलेल्या व्याजावर दहा टक्के व्याजरिबेट आणि १५ टक्के डिव्हिडंट दिला जाईल. यंदाच्या वर्षी संस्थेकडून कायम ठेव व्याजापोटी २ कोटी २५ लाख ९६ हजार ९६० रुपये तर कर्जावरील व्याज रिबेटपोटी १ कोटी १ लाख २ हजार ७४० रुपयाचे वाटप केले जाणार आहे. सभासदांच्या शेअर्सवर १५ टक्के डिव्हिडंटपोटी ६३ लाख ४ हजार ५०० रुपये असे एकूण ३ कोटी ९० लाख ४ हजार २०७ रुपयांचे सभासदांना वाटप केले जाणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, मानद सचिव चंद्रकांत तापकीर आदींसह सर्व संचालकांनी बैठकीत सहभाग घेतला.