श्रीरामपूर : बेलापूर येथील एका रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल शनिवारी (१८ जुलै) तब्बल १२ दिवसानंतर पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने सदर रुग्णाची शनिवारी सायंकाळी रॅपीड टेस्ट घेतली असता तो चक्क निगेटिव्ह आढळून आला.
बेलापूर येथे पुण्याहून आलेला एक तरुण कोरोनाबाधित आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील चार ते पाच लोकांना श्रीरामपूर शहरातील डॉ.आंबेडकर वसतीगृहात ठेवण्यात आले होते. मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये सर्वांना घरी सोडण्यात आले. त्यातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असावेत, असा अंदाज बेलापूर ग्रामस्थांनी बांधला. मात्र शनिवारी एका व्यक्तीचा तब्बल १२व्या दिवशी अहवाल आला. तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती गावात पसरली आणि सर्वजण काळजीत पडले.
आरोग्य विभागाने रुग्णाला परत श्रीरामपूर शहरात बोलवून घेतले. तेथे त्याची रॅपीज अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात तो निगेटिव्ह आला आहे.