मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची सव्वा कोटी रूपयांची रक्कम कपात करूनदेखील ही रक्कम या कर्मचा-यांच्या खात्यात जमाच झालेली नाही. त्यामुळे ही रक्कम पगारातून कपात झालेली दिसत असताना खात्यात जमा न झाल्याने मधल्या मध्येच गायब झाली आहे.याबाबत सहकार खात्याकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी पारनेरचे सहायक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सूर्यवंशी यांनी चौकशी करून याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर केला. या अहवालातूनच नगर तालुका बाजार समितीमधील कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या गोंधळावर शिक्कामोर्तब झाले आहे.सूर्यवंशी यांनी १५ मे ते २ जून २०१८ दरम्यान चौकशी करून आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार नगर बाजार समितीमधील कायम सेवेतील कर्मचा-यांना मासिक पगार अदा केल्यानंतर त्यांची जमा होणारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम बाजार समितीमार्फत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील खाते क्रमांक ८९ मध्ये जमा करते. ३१ मार्च २००९ पर्यंत या खात्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केलेली आहे. मात्र २००९ नंतर कर्मचा-यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम पूर्णत: भरणा न करता दैनंदिन व्यवहारात वापरलेली आहे, असा स्पष्ट ठपकाच या अहवालात ठेवण्यात आला आहे.तसेच सन २०१७-१८ अखेर बाजार समितीकडून भविष्य निर्वाह निधीची रक्कम १ कोटी १० लाख १२ हजार २६८ रूपये भरणा करायची बाकी आहे. त्यामुळे दोन्ही रकमा मिळून १ कोटी २८ लाख ९० हजार ४९६ रूपये भरणा करणे बाकी असल्याचे दिसत आहे.ही रक्कम बाजार समितीने दैनंदिन व्यवहारात वापरलेली आहे. बाजार समितीची ही कृती नियमबाह्य आहे आहे,असे ताशेरे सूर्यवंशी यांनी ओढले आहेत.याबाबत सूर्यवंशी यांनी समितीच्या सचिवांकडे विचारणा केली असता २००९-१० ते २०१७-१८ अखेर समितीच्या आवारात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे बाजारात कमी आवक झाली. तसेच पडलेले बाजारभाव यामुळे मिळणारे कमी उत्पन्न व समितीने नेप्ती बाजार उभारणीसाठी अॅक्सिस व महाराष्ट्र बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील द्यावे लागणारे मोठ्या प्रमाणातील व्याज यामुळे संस्थेची आर्थिक अडचण झाली. त्यामुळे कर्मचा-यांच्या पगारातील जमा झालेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम समितीने निधी उपलब्धतेप्रमाणे वेळोवेळी भरण्याचा प्रयत्न केला आहे.निधी उपलब्ध होताच बाकी असलेली १ कोटी २८ लाख ९० हजार ४९६ रूपयांची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात भरणा करणार असल्याचे सचिवांनी चौकशीदरम्यान सांगितले.आमची बाजार समिती आर्थिक अडचणीत आहे. पी. एफ. ची रक्कम नियमितपणे पगारातून कपात केलेली आहे. पण बोजा असल्यामुळे ती खात्यात भरता आलेली नाही. पण ही रक्कम इतरत्र कुठे वापरलेली नाही. जसजशी वसुली होईल, निधी मिळेल तसतशी ही रक्कम भरली जात आहे. - अभय भिसे, सचिव, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती.