अहमदनगर: कितीही उपाययोजना केल्या अन् कितीही खबरदारी घेतली तरी काविळीचा फैलाव होणे थांबलेले नाही. मंगळवारी काविळीचे आणखी ३२ नवीन रुग्ण आढळले आहेत. शहरातील २३ हॉटेल्समधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याने महापालिकेने संबंधित हॉटेल मालकांना तशा नोटिसा बजावल्या आहेत. हॉटेल्सवर कायदेशीर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागालाही महापालिकेने पत्र पाठविले आहे. गत महिन्यात शहरात कावीळ, मलेरिया सारखे साथीचे आजार पसरण्यास सुरूवात झाली आहे. शहरात काविळीचे हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. ही साथ रोखण्यासाठी महापालिकेने फिरता दवाखाना सुरू केला आहे. महासभेत त्याचे पडसाद उमटल्यानंतर आरोग्य विभागाने रोजच्या रोज सर्व्हेक्षण सुरू केले. आतापर्यंत २५ हजार ३३० घरांचे सर्व्हेक्षण आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यात ८७९ जणांना कावीळ झाल्याचे समोर आले आहे. त्यातील ५०९ जणांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. कागदोपत्री काविळीचा आकडा नऊशेच्या आसपास असला तरी हजारो रुग्ण काविळीने त्रस्त आहेत. मंगळवारी आढळलेल्या ३२ रुग्णांपैंकी १६ जण दवाखान्यात आहेत. साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने हॉटेलची तपासणी सुरू केली. आतापर्यंत ७६ हॉटेलमधील पाणी नमुने महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासले. त्यातील २३ हॉटेल्समधील पाणी पिण्यास आयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. क्लोरिनेशन करण्याची सूचना देणारी नोटीस महापालिकेने संबंधित हॉटेलमालकांना बजावली आहे. याशिवाय या हॉटेलवर कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र महापालिकेने अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहे. (प्रतिनिधी)शहरातील साथ रोगावर आळा घालण्यासाठी एल अॅण्ड टी कंपनीने महापालिकेला फिरता दवाखाना सुरू करण्यास सहकार्य केले आहे. या मोबाईल हेल्थ क्लिनिकद्वारे मोफत आरोग्य तपासणी, प्राथमिक औषधोपचार, आजार टाळण्यासाठी आरोग्य शिक्षण व सल्ला डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांकडून दिला जाणार आहे. बोल्हेगाव, सावेडी, मुकुंदनगर येथे हा फिरता दवाखाना असणार आहे. याशिवाय महापालिकेचा फिरता दवाखानाही नगरकरांच्या सेवेत आहे. शहरातील २५ हजार ३३० घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात ३७० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ५०९ जण प्रथोपचारानंतर घरी गेले. पथकाने शहरातील ७६ हॉटेलमधील पाणी नमुने तपासले. हातगाडीवाल्यांचीही होणार तपासणीशहर व उपनगरात रस्त्याकडेला अनेक हातगाड्यांवरून खाण्याचे पदार्थ विक्री केले जातात. तेथूनही साथ रोग पसरू शकतात. त्यामुळे या हातगाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बुधवारपासून इडली विकणाऱ्या हातगाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिली.
तेवीस हॉटेलमधील पाणी पिण्यास अयोग्य
By admin | Published: September 09, 2014 11:15 PM