पारनेर : रात्री विहिरीत पडल्यानंतर केवळ पाईपला धरून स्वत: चा जीव वाचवण्यासाठी बिबट्या बारा तास झुंज देत होता. आज सकाळी साडेअकरा वाजता ग्रामस्थ, वन विभागाने बसण्यासाठी लाकडी फळी टाकली. फळीचा आडोसा मिळताच बिबट्याने उडी मारून त्या फळीचा आश्रय घेत बिबट्याने सुटकेचा निश्वास सोडला. पुणेवाडी येथे बिबट्याचा हा थरार पहाण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.पारनेरजवळील पुणेवाडी येथील मार्ग वस्ती जवळ राहणारे सुखदेव चेडे यांच्या शेतातील विहिरीत सकाळी बिबट्या पाईपला धरून बसला असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. पुणेवाडीचे सरपंच बाळासाहेब रेपाळे यांनी तातडीने पारनेरचे तहसीलदार, पारनेर पोलीस व वन विभाग यांना माहिती दिली. तोपर्यंत बिबट्याला पाहण्यासाठी मोठीं गर्दी झाली होती. बिबट्या ज्या विहिरीत पडला ती विहीर खोल व पाणीही मोठ्या प्रमाणावर होते.रात्री विहिरीत पडल्यानंतर बिबट्या मोटारीसाठी असलेल्या पाईपला धरून जीव वाचवण्यासाठी संघर्ष करीत होता. काहीेजण पाईप हलवत असल्याने बिबट्याची चांगलीच तारांबळ उडाली. पाण्यात बुडून वर आल्यावर पुन्हा पाईप घट्ट धरून बसण्याची कसरत बिबट्याला कराव्या लागल्या. बिबट्याची ही स्थिती पाहून पुणेवाडीचे सरपंच बाळासाहेब रेपाळे, सौरभ रेपाळे, राहुल चेडे, पुणेवाडी सेवा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब रेपाळे, सोमनाथ अरण्ये, प्राणी मित्र रावसाहेब कासार व ग्रामस्थांनी वन विभागाचे अधिकारी अनंत कोकाटे व पथकाला तातडीने बिबट्याला वाचविण्याची विनंती केली. वनाधिकारी कोकाटे व कर्मचा-यांनी दोर बांधून लाकडी फळी विहिरीत सोडली आणि बारा तास पाण्यात जीवाशी झुंज देणा-या बिबट्याने टुणकन फळीवर उडी मारली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. नंतर पिंजरा टाकून बिबट्याला बाहेर काढण्यास वन विभागाला यश मिळाले.
- पिंजरा आणला दोर विसरले
- सकाळी नऊ वाजता बिबटया विहिरीत पडल्याची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर दीड तासाने वन विभागाचे कर्मचारी विहीरी जवळ आले. कर्मचा-यांनी पिंजरा आणला परंतु पिंज-याला बांधण्यासाठी दोरच आणला नाही. शेवटी शेतक-याकडून दोर घेण्यात आला. वन विभागाच्या भोंगळ कारभारावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.