कोपरगाव : शहरातील घरे व व्यावसायिक दुकाने फोडून चोरी करणारा तसेच दुचाकीची चोरी करणाऱ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संजय अर्जुन पाटील (वय ४०, रा. शिरूर नाका, अंमळनेर, जि. जळगाव) याने कोपरगाव शहरातील चंद्रहास पैठणी शोरूम, कोपरगाव साडी सेंटर, साईस्वरूप यामाहा बाइक व समर्थ इलेक्ट्रीक या चार शोरूमचे १ व ४ मार्च अशा दोन दिवशी रात्रीच्या सुमारास पत्रे उचकटून ७२ हजार २०० रुपयांची रोख रक्कम व मुद्देमालाची साडी घालून चोरी केली होती. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावर पोलीस निरीक्षक वासुदेव गवळी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत सूत्रे हलविली. शिर्डीतील कालिकानगर येथून संजय पाटील याच्या गुरुवारी मुसक्या आवळल्या असून वरील सर्व चोऱ्या त्यानेच केल्या असल्याची कबुली दिली आहे.
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अर्शद इलियाज बागवान (वय १९, रा. कोपरगाव) याने शहरातील आयशा कॉलनी येथील मझहर मेहबूब अत्तार यांच्या मालकीची (एमएच १७, सीजे १३२९) ही दुचाकी २३ फेब्रुवारीला चोरून नेली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अर्शद बागवान हा चोरी केलेली दुचाकी घेऊन चमडा बाजार येथे येणार असल्याची पोलिसांना गुप्त खबर मिळाली होती. तो तेथे आला असता पोलिसांनी त्यास गुरुवारी दुचाकीसह ताब्यात घेतले. अटकेतील दोन्ही आरोपींना शुक्रवारी कोपरगाव न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.