बाळासाहेब सुपेकर । कुळधरण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने पुण्या-मुंबईकडे जाणारी मालवाहतूक बंद आहे. त्यामुळे कुळधरण (ता. कर्जत) येथील एका शेतकºयाला दोन एकरातील टोमॅटोची माती झाली. शेतक-याने हा टोमॅटो उपटून मेंढ्यांना टाकला. यामध्ये त्याचे लाखोंचे नुकसान झाले. येथील शेतकरी बापूराव नारायण जाधव याने दोन एकरात टोमॅटोची लागवड केली. त्यांनी दोन एकरातील टोमॅटोवर रोपे, खते, औषधे, मशागत, तार, काठी अशा गोष्टींसाठी तब्बल दोन लाख रूपये खर्च केला होता. वारंवार हवामान बदल झाल्याने त्यांना कीटकनाशक फवारणीचा खर्चही अधिक झाला. उन्हाळी हंगाम असल्याने पाणीही अत्यल्प होते. तरीही त्यांनी योग्य नियोजन करून टोमॅटो जगविला. योग्य नियोजन असल्याने टोमॅटोही चांगला आला होता. त्यांना त्यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच. लॉकडाऊनच्या काळात विक्री न झाल्याने टोमॅटो शेतातच राहिला. अखेर त्यांनी टोमॅटो उपटून मेंढ्यांना टाकला. लॉकडाऊनमुळे शेतामधील भाजीपाला, शेतमाल विक्रीसाठी मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत नेता आला नाही. तसेच परिसरातील सर्व आठवडे बाजाराही बंद आहेत. त्यामुळे टोमॅटो शेतातच राहिला. त्यातच आधुनिक पद्धतीने लागवड केल्याने खर्चही अधिक झाला होता. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले, असे कुळधरण येथील टोमॅटो उत्पादक बापू जाधव यांनी सांगितले.
दोन एकरातील टोमॅटोची माती; कुळधरणच्या शेतक-याची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 12:40 PM