जामखेड : शहरात विक्रीसाठी आणलेली एक लाख रुपये किमतीची चार पिस्टल व सहा काडतुसे पोलिसांनी जप्त करीत दोन तरुणांना अटक केली. या दोघांना अटक केल्याने पिस्टल विक्रीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. शुक्रवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास जामखेड शहरात पोलिसांनी ही कारवाई केली.
ऋषी ऊर्फ (पप्पू) मोहन जाधव (वय २२, रा.जामखेड) व दीपक अशोक चव्हाण (वय ३२, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ऋषी ऊर्फ (पप्पू) मोहन जाधव व दीपक अशोक चव्हाण हे दोन तरुण पिस्टल विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह त्यांच्या घरी छापा टाकला. त्यांच्याकडे चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे आढळून आली.
ऋषी ऊर्फ (पप्पू) मोहन जाधव याच्याकडे वापराची परवानगी नसलेले ७.६२ एमएमचे २५ हजार दोनशे रुपये किमतीचे एक अग्निशस्त्र पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळली. दीपक अशोक चव्हाण याच्याकडे ७० हजार ४०० रुपये किमतीच्या एकूण ३ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे आढळून आली. त्याने हे पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने आणले होते. शहर व तालुक्यात अनेक वेळा बेकायदा रिव्हॉल्वर व गावठी कट्ट्यांचा वापर करून अनेक गुन्हे, खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. त्यातच पुन्हा ४ पिस्टल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यातून पिस्टल विक्रीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
याप्रकरणी पो. कॉ. आबासाहेब आत्माराम आवारे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. थोरात करीत आहेत.
उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लाटे, आबासाहेब आवारे, संग्राम जाधव, अविनाश ढेरे, विजयकुमार कोळी, अरुण पवार, संदीप राऊत, संदीप आजबे, विष्णू चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---
दोन फोटो
१३ जामखेड क्राईम
जामखेड पोलिसांनी छापा टाकत दोघांसह चार पिस्टल, सहा काडतुसे जप्त केली.