- शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील हरेगाव येथील तरुणांना क्रूर पद्धतीने मारहाणप्रकरणी फरार असलेल्या दोघा आरोपींना पुणे येथून अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्यात यापूर्वी दोन आरोपी अटकेत असून नानासाहेब गलांडे याच्यासह तीन आरोपी अद्याप फरार आहेत. सोमवारी अटक केलेल्या आरोपींमध्ये युवराज नानासाहेब गलांडे आणि मनोज बोडखे याचा समावेश आहे. नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना पुणे येथून ताब्यात घेतले. वारजे परिसरात दोघेही लपून बसलेले होते. त्यांना संध्याकाळी श्रीरामपुरात आणण्यात आले. न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता २ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
गुन्ह्यातील पप्पू पारखे आणि दीपक गायकवाड या दोघा आरोपींना शनिवारी रात्री अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अँट्रोसिटी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा आरोपींवर दाखल आहे. गुन्ह्यात सात आरोपी असून यातील नानासाहेब गलांडे, दुर्गेश वैद्य व राजू बोरगे हे अद्याप फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या शोधासाठी नियुक्त करण्यात आले आहे.'
दरम्यान, आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.२९) श्रीरामपूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. सर्वपक्षीय पक्ष व संघटना त्यात सहभागी होणार होत्या. मात्र गुन्ह्यातील चार आरोपींना अटक झाल्याने श्रीरामपूर बंद मागे घेण्यात आला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे १ सप्टेंबरला हरेगाव येथे येत आहेत. पीडितांची ते भेट घेणार आहेत. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेही येणार आहेत.