ज्ञानेश्वर कौतुक हरपे (वय २१, रा. सिडको, औरंगाबाद, हल्ली रा. एमआयडीसी अहमदनगर) व महेश नारायण कुऱ्हे (वय २६, रा. सावेडी, मूळ रा. शिरूर, जिल्हा बीड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणात वांबोरी येथील सुहास जगताप याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मंगळवारी माहिती मिळाली की, तारकपूर परिसरात एक व्यक्ती काळ्याबाजारातून रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करत आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांना माहिती देण्यात आली. यावेळी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून दोन्ही आरोपींना जेरबंद केले. या दोघांनी वांबोरी येथील सुहास जगताप यांच्याकडून हे इंजेक्शन घेतले असल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनमधील औषध निरीक्षक विवेक पांडुरंग खेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे पुढील तपास करत आहेत.
.........
रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या
नातेवाईकांची धडपड
मागणी तसा पुरवठा होत नसल्याने नगरमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. डॉक्टर मात्र हे इंजेक्शन घेऊनच या, असे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगत आहेत. याच संधीचा फायदा घेत काही नराधम अवघे दीड ते दोन हजार रुपयांचे इंजेक्शन तब्बल ३५ ते ४० हजार रुपयांना विकत आहेत.