श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर शहरातील संजयनगर भागात दोघा तरुणांना गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. त्यांचे दोन साथीदार मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.
आरोपींमध्ये अक्षय राजू फुलारे (वय २५) व शहबाज युनूस पटेल (वय ३०) यांचा समावेश आहे. शाहरुख युनूस पटेल व फिरोज इब्राहिम पठाण हे दोघे आरोपी पोलिसांना चकवा देत पसार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींकडून दोन कट्टे व आठ जिवंत काढतुसे मिळून आले.
पोलिस हवालदार रंजीत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात श्रीरामपूर व लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ते सराईत गुन्हेगार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली.