कोपरगाव : क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून आठ जणांनी मिळून दोघा खेळाडूंना शिवीगाळ करीत बॅट व स्टंपने तोंडावर, हातापायावर मारहाण करून जखमी केले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील वारी येथील सोमैया कारखान्याच्या क्रिकेट मैदानावर रविवारी (दि.२८) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
या मारहाणीत खेळाडू अतुल विनायकराव लोंढे (वय ३८) व संगीत विनायकराव लोंढे (वय ३५, दोघे रा. बाभूळगाव खुर्द, ता. येवला, जि. नाशिक) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी अतुल विनायकराव लोंढे यांच्या फिर्यादीवरून संजय सुभाष जाधव, अभिजित दीपक जाधव, मंजाहारी सुभाष जाधव, भूषण दीपक जाधव, नामदेव शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही), संदीप सुरेश जाधव, विठ्ठल बाळासाहेब जाधव, जय संजय जाधव (सर्व रा. वारी, ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारी येथे २३ मार्चपासून मच्छिंद्र टेके मित्रमंडळाच्या वतीने विवेकभैया कोल्हे चषकाच्या क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. रविवारी या चषकातील सामन्याचा अंतिम दिवस होता. या स्पर्धेत मारहाण झालेल्या खेळाडूंचा सेमी फाइनलचा सामना सुरू होता. यादरम्यान नाशिक क्रिकेट टीमचा खेळाडू अशोक साहेबराव गुंजाळ (रा. येवला, जि. नाशिक) यावर संजय सुभाष जाधव याने संशय घेतला. त्यावर नाशिक टीमचे अतुल लोंढे हे पंचाशी बोलत असतानाच संजय जाधव याने अतुल व त्यांचे भाऊ संगीत लोंढे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या बरोबर असलेल्या वरील उर्वरित सात जणांनी ग्राउंडवर पळत येत बॅट व स्टंपने दोघांना मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र म्हस्के करीत आहेत.