श्रीरामपूर(जि.अहमदनगर) : जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेला भाचा खाणीत पाय घसरून बुडाला. त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या दुस-या भावाचा व मामीचा देखील पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव शिवारात आज दुपारी घडली. मयतांमध्ये मामी कविता गणेश खंडागळे (वय २८, रा. वळदगाव, ता. श्रीरामपूर), ओंकार दादासाहेब डुकरे (वय १०), शुभम दादासाहेब डुकरे (वय १२, दोघेही रा.शिरोली, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा समावेश आहे.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, ओंकार व शुभम हे मामा गणेश खंडागळे यांच्याकडे सुटीसाठी आले होते. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे सर्वजण जनावरांना पाणी पाजण्यासाठी खटकळी येथील दगड खाणीत गेले होते. यातील एक मुलगा पाय घसरून पाण्यात पडला. हे पाहून मामी कविता व दुसरा भाचा त्याच्या मदतीला धावला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते देखील पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती परिसरात मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वळदगावचे पोलीस पाटील शिवाजी नानासाहेब भोसले यांनी पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेने वळदगाव परिसरावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी शिवाजी भोसले यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.