उक्कलगाव : प्रवरा नदीकाठावरील उक्कलगाव परिसरात एका उसाच्या शेतात गुरुवारी दुपारी दोन बिबट्याचे बछडे आढळून आले. ते वनविभागाच्या कर्मचा-यांनी ताब्यात घेतले आहेत. दरम्यान परिसरात घबराटीचे वातावरण आहे. या भागातील उक्कलगाव, गळनिंब, चांडेवाडी, ममदापूर, मांडवे, कडीत, फत्याबाद, कुरणपूर या गावांमध्ये गेल्या महिन्यापासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना ताज्या असताना हे बिबट्यांचे बछडे मिळून आले आहेत. भारत जगधने यांच्या शेतात गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान ऊस तोडणी सुरु असताना ते मिळून आले. शेतक-यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचा-यांना संपर्क केला. कोपरगाव येथील वनक्षेत्रपाल संतोष जाधव यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. लहान बछडे दोन महिन्यांचे असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. यावेळी नागारिकांनी बछड्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उक्कलगाव शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अशोक जगन्नाथ थोरात यांच्या वस्तीवर बिबट्याने गुरुवारी रात्री कुत्रे आणि रान बोक्यांचा फडशा पाडला. परिसरात बारा ठिकाणी लावले पिंजरे भारत जगधने यांच्या शेतात ऊसतोडणी सुरु असल्यामुळे वन विभागाच्या अधिकºयांनी नजीकच नवीन पिंजरा लावत त्यात बिबट्याचे बछडे ठेवले आहेत. वन विभागाचे कर्मचारी येथे तळ ठोकून आहेत. या परिसरात तब्बल बारा पिंजरे लावण्यात आले आहेत. गळनिंब येथे बिबट्याने मुलीला ठार केल्याची घटना घडली असल्याने तेथे सहा पिंजरे लावले आहेत. मांडवे, फत्याबाद शिवारात उर्वरित पिंजरे लावल्याची माहिती देण्यात आली. मात्र बिबटे त्यास हुलकावणी देत आहेत.
बिबट्याचे दोन बछडे आढळले; बारा ठिकाणी लावले पिंजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 3:27 PM