अहमदनगर : नगरमध्ये नव्याने आढळलेले दोन रुग्ण मुंकूंदनगर परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. औरंगाबादमार्गे जाणारी वाहतूक सोमवारी (३० मार्च) सकाळी बंद करण्यात आल आहे.महापालिकेच्या बांधकाम विभागाने औरंगाबाद महामार्गावरील पंचवटी हॉटेलपासून मुंकूदनगरकडे जाणारे रस्ते बॅरिकेट टाकून बंद करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी बांबू बांधून रस्ते बंद करण्यात आले आहेत. पोलिसांचा फौजफाटाही या परिसरात दाखल झाला आहे.मुंकूदनगरमधील केरुळकर मळ्याकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात येणार आहे. दर्गादायरा, न्यायनगर गोविंदपुराकडे जाणारे रस्तेही बॅरिकेट टाकून बंद करण्यात येणार आहेत. या दोन व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासकीय यंत्रणेकडून घेतला जात आहे. याशिवाय हे दोन्ही रुग्ण जामखेडमध्ये दहा दिवस मुक्कामी होते. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मुंकूदनगर येथील नागरिकांमध्ये कमालीचे भितीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून हा भाग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, पुढील उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नगरमध्ये दोन कोरनाचे रुग्ण आढळले; मुकूंदनगर परिसर महापालिकेने केला ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:27 AM