राहुरी : मुळा धरणावर असलेले दोन बंधारे अचानक फुटले आहेत. त्यामुळे मुळा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग २००० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे़. मंगळवारी सकाळपर्यंत नदीपात्रातील विसर्ग कमी होईल, अशी माहिती मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़. भागडा चारीचे आवर्तन पूर्ववत सुरू करण्यात आले आहे़.मुळा धरणात असलेल्या २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा कायम ठेऊन नदीपात्रात आवर्तन सोडले जाते़. धरणावर असलेले जिल्हा परिषदेचे दोन बंधारे अचानक फुटले़. याशिवाय धरणावर रिमझीम पावसाने हजेरी लावली़. पर्यायाने पाटबंधारे खात्याने नदीपात्रातील आवर्तन सुरूवातीला १००० क्युसेकवरून १ हजार ५०० क्युसेकपर्यंत केले़. त्यानंतर पाण्याची पातळी स्थीर ठेवण्यासाठी २००० क्युसेकपर्यंत नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला आहे़.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे़. लाभक्षेत्रावर पाऊस पडत असल्याने तीन दिवसांपूर्वी शेतक-यांच्या मागणीनुसार उजवा कालवा बंद करण्यात आला होता़. याशिवाय डावा कालवाही बंद होता़. भागडा चारीचे एक्सप्रेस फिडर बिघडल्याने आवर्तन बंद होते़. फिडर सुरू झाल्याने पुन्हा भागडा चारीतून ५० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू झाले असल्याची माहिती भागडा चारीचे अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़. मुळा धरणात पाण्याची पातळी १८१२ फूट इतकी आहे़. धरण १०० टक्के भरले आहे. आतापर्यंत कोतूळ येथे तब्बल ११७० मिमी पावसाची नोंद झाली आहे़. मुळानगर येथे आतापर्यत ६३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. कोतुळ येथून पाण्याची ७०० क्युसेकने आवक सुरू आहे़.
मुळा धरणावरील दोन बंधारे फुटले; नदीपात्रात विसर्ग वाढविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 5:00 PM