श्रीगोंदा /कर्जत (जि.अहमदनगर) : श्रीगोंदा कर्जत तालुक्याच्या सीमा रेषेवरील भोसे शिवारातील एका विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या टीमने पिंजरा लावून जेरबंद केले. मंगळवारी २२ मिनिटांच्या रेस्क्यु ऑपेरेशननंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.
भोसे शिवारातील अंकुश रंगनाथ क्षीरसागर यांच्या शेतातील विहीरात दोन दिवसापुर्वी नर जातीचा एक बिबट्या पडला आणि मंगळवारी सकाळी अंकुश क्षीरसागर हे विहीरीवर गेले असता बिबट्याने विहीरातुन डरकाळी फोडली. अंकुश क्षीरसागर यांनी बिबट्याला पाहिले. मिरजगावचे वनपाल रवी तुपे यांना कल्पना दिली. तुपे यांनी पाहणी करुन वरिष्ठांना कल्पना दिली.
वन परिक्षेत्र अधिकारी (पुणे) येथील वन्य जीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक कल्याण साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव माकडे वन्य जीव परिक्षेत्र विवेक नातू यांनी शिरुर येथील वन्य जीव विभागाची आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. श्रीगोंदा कर्जत जामखेड वन विभागाचे कर्मचारी यांनी विहिरीतील बिबट्या काढण्यासाठी पिंजरा आत सोडला आणि २२ मिनिटात बिबट्या पिंजऱ्यात आडकला.
बिबट्या पार्कमध्ये बिबट्याचे वजन सुमारे १०० किलो असुन या बिबट्याची रवानगी बंदोबस्तात माणिकडोह येथील बिबट सफारी पार्क मध्ये करण्यात आली आहे.
मुक्त बिबटे पकडणार नाही श्रीगोंदा कर्जत तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. पाणी अन्न शोधार्थ बिबट्यांनी या भागाकडे धाव घेतली आहे. शेतकरी रान डुकरांच्या उपद्रवाने त्रस्त आहे रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी बिबट्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे या भागात शेतात अगर आडोशाला असलेले बिबटे पकडले जाणार नाहीत. विहीरात अगर घरात गोठ्यात बिबट्या घुसला तरच बिबट्या पकडला जाणार आहे.-कल्याणराव साबळे सहायक वनसंरक्षक वन्य जीव, पुणे