अहमदनगर : महापालिकेने ७५ टक्के शास्तीमाफीसाठी मुदतवाढ दिली असून, ही मुदत येत्या १५ डिसेंबर रोजी संपणार आहे. ही सवलत घेण्यासाठी नागरिकांना पुढील दोन दिवसांत थकीत कर भरावा, असे अवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्तांनी ७५ टक्के शास्तीमाफीची घोषणा केली. ही सवलत ३० नोव्हेंबरपर्यंत होती. एका महिन्यात सुमारे ४३ कोटींची वसुली झाली. शास्तीमाफीला प्रतिसाद मिळाला. नगरसेवकांनी मुदत वाढविण्याची मागणी केली. त्यानुसार आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शास्तीमाफीला १५ डिसेंबरपर्यंत मुदत वाढविली. ही सवलत मंगळवारी संपणार आहे. गेल्या १३ दिवसांत ३ कोटींचा कर वसूल झाला. थकबाकीदारांसाठी मुदत वाढवून देण्यात आली; परंतु मुदतवाढूनही भरणा वाढला नाही. त्यामुळे महापालिकेच्या वसुली विभागाने नोटिसांवर भर दिला असून, कर न भरल्यास कारवाईही केली जाणार आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले. त्यामुळे नागरिकांनी कर भरला नाही. महापालिकेनेही कर वसुली केली नाही. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना बिलांचे वाटप झाले नाही. गत नोव्हेंबरमध्ये बिलांचे वाटप करण्यास सुरुवात झाली. वसुली लिपिकांनी थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या असून, मुदतीत कर न भरल्यास पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
..
५० टक्के शास्तीमाफीची सवलत
महापालिका आयुक्तांनी १५ ते ३१ डिसेंबर या काळात ५० टक्के शास्तीमाफीची सवलत जाहीर केली आहे. या काळात थकीत कर भरणाऱ्यांना शास्तीवर ५० टक्के सूट मिळणार आहे; परंतु ७५ टक्के शास्तीमाफीला मुदतवाढ दिल्यानंतर नागरिकांनी भर भरला नाही. त्यामुळे ५० टक्के सवलतीला प्रतिसाद मिळतो की नाही, याबाबत साशंकता आहे.