राहुरी : पावसाअभावी नगर जिल्ह्यातील शेतक-यांचा हिरमोड झाला असून येत्या २१ व २२ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यात हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने व्यक्त केला आहे. रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढला असून शेतक-यांना विद्यापीठाने हवामानावर आधारित कृषी सल्ला दिला आहे.कपाशी पिकावर गुलाबी अथवा श्ंोदरी बोंडअळीचा अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मीटर अंतरावर शेतात उभारावेत, असा सल्ला शेतक-यांना विद्यापीठाने दिला आहे. दर १५ दिवसांनी ल्यूर बदलावेत़ पात्या, फुले, बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स या संजीवकाची एकरी ४० मिली १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झॉकोनॅझोल ५ टक्के ईसी २५ मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकाच्या भोवती फिरून कीड व रोगाचे निरीक्षण करावे. सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा हिरव्या उंट अळी गर्डल बीटलच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रनीलप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३ मिली फ्ल्युबेंडामाईड ३९़३५ टक्के प्रवाही २ मिली अथवा लुफुनुरॉन ५.४ टक्के प्रवाही १२ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.कांदा पिकावर फुलकिडे व करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कार्बोसल्फान २५ ईसी १५ मिली किंवा फिप्रोनिल ५ ईसी १५ मिली फवारणी करावी़, असा सल्ला देण्यात आला आहे.भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवसात कमाल तापमान ३१ ते ३४ अंश सेल्सिअस राहील व किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशता ढगाळ राहील. २१ व २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी येतील. कमाल आर्द्रता ६७ ते ७८ टक्के राहील़ किमान आर्द्रता ४० ते ५४ टक्के राहील. वा-याचा ताशी वेग ९ ते १६ किलोमीटर राहील. - रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
नगर जिल्ह्यात दोन दिवस हलका पाऊस : कृषी विद्यापीठाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 4:36 PM