कोतूळ/कुळधरण(अहमदनगर) : कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथे एका शेतकर्याने शुक्रवारी विष घेऊन तर अकोले तालुक्यातील बोरी गावातील शेतकर्याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रेहेकुरी येथील सुदाम उमाजी मांडगे या शेतकर्याने विष घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली. ते ६0 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. त्यांच्या नावे दोन हेक्टर तीस गुंठे जमीन असून पाच लाखांचे कर्ज होते. कर्जाच्या तगाद्यामुळे मांडगे यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मांडगे यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविल्याचे तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी सांगितले.दुसर्या घटनेत कोतूळजवळील बोरी येथील शेतकरी सुदाम तुकाराम साबळे (वय ६५) या शेतकर्याने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. साबळे यांना ३ एकर जमीन होती. ५ मुली असल्याने सर्वांचे लग्न शेतीचे तोकड्या उत्पन्नावर केले. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने सहा महिन्यांपूर्वी त्यांनी ३ एकर जमीन नातेवाईकास विकली. ज्या शेतीवर आयुष्याची गुजराण केली, तीच विकावी लागल्याचे शल्य साबळे यांच्या मनात होते.
अहमदनगर जिल्ह्यात दोन शेतकर्यांची आत्महत्या
By admin | Published: February 03, 2015 5:27 PM