राहुरी : राहुरी तालुक्यातील गुहा येथे यात्रौत्सवात नाचण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले असून, दोन्ही गटातील १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर ९ जणांना अटक करण्यात आली आहे.मंगळवारी (दि़ ६) गुहा येथे कानिफनाथांचा यात्रा उत्सव होता़ यात्रेत छबीना व तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाचण्याच्या कारणावरुन दोन गटात भांडणे झाली़ या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले़ या हाणामारीत ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती कळताच श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाकचौरे व राहुरी येथील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.या घटनेमध्ये एका गटातील प्रफुल्ल चंद्रभान ओहळ, अजिंक्य राजेंद्र बारसे, अनिल चंद्रभान ओहळ, महेश हिरामण ओहळ, किरण ताराचंद ओहळ या पाच जणांना अटक करुन किरण ओहळ, नारायण ओहळ, रणजित जाधव (सर्व रा़ गुहा) अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला़ दुसºया गटातील सागर ऊर्फ बाळू श्रीपती कोळसे, साईनाथ भाऊसाहेब कोळसे, सोमनाथ शंकर कोळसे, अनिल ऊर्फ एकनाथ लक्ष्मण कोळसे यांना अटक केली तर सौरभ बबन कोळसे, नवनाथ जालिंदर कोळसे, आकाश श्रीपती कोळसे, नितिन यशवंत कोळसे (सर्व रा़ गुहा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून, एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दोन्ही गटातील एकूण ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे़ पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाकचौरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.
गुहा येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; १६ जणांवर गुन्हा, ९ जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 4:16 PM