कोपरगाव : शहरातील हॉटेल चालकांना ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत फक्त पार्सल सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी (दि.०९) शहरातील गुरद्वारारोड येथील रसरंग व सावरकर चौक येथील रसराज या दोन नामवंत हॉटेल चालकांनी शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून चक्क ग्राहकांना आत बसवून घेत सेवा दिली.
त्यावर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्या भरारी पथकाने हॉटेलवर कारवाई करीत दोनही हॉटेल सात दिवसांसाठी सील केली आहेत. विशेष म्हणजे ही दोनीही हॉटेल एकाच मालकाची असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे गोर्डे यांनी सांगितले.
शुक्रवारी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांची विविध भरारी पथके करून शहरातील मार्केट भाग, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बँक रोड, मंगल कार्यालय अशा विविध भागात धडक मोहिमी राबविल्या. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सुरू असलेल्या सेवा, छोटे व्यावसायिक व नागरिक यांना चर्चेद्वारे इतर आस्थापना बंद करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.