करंजी/तिसगाव : सार्वजनिक स्वच्छतेसाठी ‘सुटीच्या दिवशी दोन तास’ या संकल्पनेला घाटशिरस (ता. पाथर्डी) येथे रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला.
येथील युवा सरपंच गणेश पालवे यांनी पदभार घेतल्यानंतर केवळ आदेश देणे हा प्रकार वगळून थेट कृती सहभाग नोंदविण्याची ही संकल्पना मांडली होती. याच सामूहिक भावनेतून रविवारी २५ युवकांनी वृद्धेश्वर देवस्थान प्रवेशद्वार, ऐतिहासिक ज्ञानवापी बारव वृद्धा नदी उगम स्थान परिसरात स्वच्छता केली. दुपारचे जेवणाचे जोडीने खोरे, घमेली खुरपे असे साहित्य त्यांनी सोबतीला आणले होते. नारळाची कापटे हारांचे निर्माल्य प्लास्टिक पिशव्यांचे ढीग करून पेटवून देत त्यांनी घनकचरा नष्ट केला.
यावेळी प्रा. राम पालवे म्हणाले, मुंबईसह राज्यातील विविध शहरांत नोकरी व्यवसायानिमित्त गावचे अनेक भूमिपुत्र आहेत. महाशिवरात्रीसह यात्रेनिमित्त सेवाभाव म्हणून ते प्रत्येकी हजार रुपये सहभाग देऊन भाविकांना फराळ व अन्नदान सेवा देतात. कोरोनामुळे सर्वच बंदी आहे. त्यामुळे देवराई येथे अशाच प्रकारच्या लोकसहभागातून स्वागत कमान, शुद्ध पेयजल सुविधा असे उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सोमनाथ पाठक, विठ्ठल पालवे, अर्जुन भताने, प्रकाश चोथे, निलेश केकाण, आबासाहेब डोंगरे, उत्कर्ष उगलमुगले, कृष्णा दहिफळे, अशोक कर्डिले, बाळू पुरी, दामू मिसाळ, कानिफनाथ पाठक, संतोष गर्जे आदींसह चाळीस स्वच्छता अभियानात कृती प्रतिसाद लाभला. अक्षय पालवे, राम पाठक यांनी अल्पोपाहार दिला.
---
१७ घाटशिरस
घाटशिरस येथे स्वच्छता अभियानात सहभागी झालेले युवक.