अहमदनगर: नगर शहरात गुंठाभर जागेत सिंगल साईजचे घर बांधायचे असले तरी परवानगीसाठी महापालिकेच्या नगररचना विभागातून तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली जाते. डाटा एन्टी ऑपरेटरपासून सर्वांनाच पैसे द्यावे लागतात. घर बांधताना संबंधिताकाडून अधिकृत शुल्क घेतले जाते नंतर त्याला मनपाचे सर्व कर भरावे लागतात, असे असताना घरासाठी अतिरिक्त पैसे कशासाठी घेतले जातात,ही महापालिका आहे की, टोलनाक? असा सवाल करत विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमार वाकळे व डॉ. सागर बोरुडे यांनी नगररचना विभागावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली.
महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.२०) महापालिकेत महाससभा झाली. सभेला उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदिप पठारे, यांच्यासह उपायुक्त, विभाग प्रमुख व नगरसेवक उपस्थित होते. सभा होताच बारस्कर व वाकळे यांनी नगररचना विभागाला धारेवर धरले. काही नगरसेवकांनाही घर बांधणीसाठी पैसे द्यावे लागले आहेत. परवानगी मागणाऱ्याने नगरसेवककाडे तक्रार केली तर जास्त पैसै द्यावे लागतील, अशी धमकी संबंधित अधिकाऱ्यांकडून दिली जाते.
अधिकारी, कर्मचारी का पैसे मागतात, त्यांना पगार मिळत नाही का असा संतप्त सवाल यावेळी बारस्कर यांनी उपस्थित केला. दरम्यान या आरोपावर नगररचना विभागातील सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र, नगरसेवकांचे समाधान झाले नाही.