अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक उद्योग धंदे, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे कामगारांचा रोजगार गेला. सरकारच्या बिगेन अगेनमुळे गेलेली नोकरी पुन्हा मिळाली. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. सरकारने रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी, असा आदेश लागू केला आहे. त्यामुळे कारखाने, दुकानदार, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे दोन लाख कामगारांचा जीव टांगणीला लागला आहे.
सरकारने नव्या लॉकडाऊनची घोषणा करताना कामगारांना कामावरून काढता येणार नाही, असे निर्देश सर्वच आस्थापनांना दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विविध वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने, बाजार पेठेतील दुकानदार आदी व्यवसायांवर कमी अधिक प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे हॉटेल, दुकाने, मॉल्स, कारखाने बंद होते. उद्योग व्यवसाय बंद पडल्याने कामगारांनी घरचा रस्ता धरला. अनेक कामगार गावी निघून गेले. लॉकडाऊनमुळे गावी जाण्यासाठी वाहने मिळाली नाहीत. म्हणून कामगारांनी अनवणी गाव गाठले. लॉकडाऊन शिथिल होऊनही कामगार कामावर हजर होत नव्हते. कारखानदार व दुकानदारांनी आगाऊ रक्कम देऊन त्यांना कामावर बोलावून घेतले. कोरोनाच्या धक्क्यातून उद्योग व्यवसाय सावरत असतानाच दुसरी लाट येऊन धडकली. गेल्या आठ दिवसांपासून लॉकडाऊनची चर्चा सुरू होती. अखेर सरकारने रात्रीची संचार बंदी व दिवसा जमावबंदी, असे धोरण स्वीकारले. परंतु, त्याचाही परिणाम उद्योग व्यवसायांवर होणार असल्याने नोकरी किती दिवस टिकेल, याचा भरोसा नाही आणि नोकरी टिकलीच तर पगार वेळेवर मिळेलच, याची शास्वती नाही. मिळालाच तर काही कपात होणार नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न सध्या कामगारांसमोर आहेत.
...
गाळीप संपले आता करायचे काय
जिल्ह्यात साखर कारखान्यांची मोठी संख्या आहे. यंदा पाऊस पुरेसा पडल्याने गळीत हंगामही चांगला झाला. कारखान्यांचे गळीप हंगाम संपल्याने कामगार गावाकडे निघाले आहेत. हंगाम संपल्यानंतर अनेक ऊस तोड कामगार शहरांत येऊन मिळेल ते काम करत असतात. परंतु, लॉकडाऊनमुळे त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे गाळप संपले, आता करायचे काय, असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.
...
असे आहेत कामगार
नोंदणीकृत कारखाने- ९५०, कामगार- ५०,०००
दुकाने-८०,०००, कामगार-७३,००००
बांधकाम कामगार-५६,८३५
माथाडी कामगार-२,८६६
सुरक्षा रक्षक-४०५
.......
परप्रांतीयांची घालमेल
जिल्ह्यात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची संख्या सुमारे १६ हजार ६४९ इतकी होती. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ३ हजार ४११ परप्रांतीय कामगार आपल्या गावी निघून गेले. हा आकडा यापेक्षाही जास्त असल्याचे काहींचे म्हणणे आहे. परप्रांतीय कामगार परत आले आहेत. परंतु, लॉकडाऊनच्या भीतीने त्यांची घालमेल सुरू आहे.
...
लॉकडानच्या काळात ३५ तक्रारी
मागील लॉकडाऊनच्या काळात मालकांनी पगार न दिल्याबाबतच्या ३५ तक्रारी कामगार विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, कामगारांना १५ लाख ११ हजार ८०० रुपये देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.