कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे सोमवारी (दि. १५) आणखी दोन गायींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील मृत जनावरांचा एकूण आकडा ११वर गेला आहे. त्यामुळे गावातील पशुपालक धास्तावले आहेत.
रांजणगाव देशमुखमध्ये मागील आठवड्यात कैलास मुरलीधर गोर्डे या शेतकऱ्याच्या पाच गायी दगावला होत्या, तर दशरथ साहेबराव खालकर यांच्या दोन, संपत खालकर यांची एक गाय, तर अनिल खालकर यांचा एक बैल अशी एकूण नऊ जनावरे दगावली होती. येथील जनावरे दगावण्याचे सत्र अद्याप सुरूच असल्याने सोमवारी पुन्हा कैलास गोर्डे यांची व संपत खालकर यांची प्रत्येकी एक गाय मृत झाली आहे. त्यामुळे एकट्या गोर्डे यांच्या तब्बल सहा, तर खालकर यांच्या दोन गायी दगावल्या आहेत. ही जनावरे नेमकी कशाने दगावत आहेत. याचा अजूनही उलगडा होत नसल्याने पशुपालक चिंतेत बुडाले आहेत.
............
सध्या हिरव्या चाऱ्याची नायट्रोजन पातळी वाढली आहे. त्यातून ओगझिलेट हा हानिकारक घटक तयार होत आहे. असा चारा जनावरांनी खाल्ल्यानंतर चाऱ्यातील ओगझिलेट व जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम एकत्र येऊन कॅल्शियम ओगझिलेट तयार होतो. त्यामुळे जनावराच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी झपाट्याने कमी होऊन जनावर खाली बसते. काही दिवसात मृत होते. हे टाळण्यासाठी अशी लक्षणे आढळल्यास शेतकऱ्यांनी जनावरांना दररोज ५० ते १०० ग्रॅम कॅल्शियम पावडर द्यावी तसेच चुन्याची निवळीदेखील द्यावी.
- डॉ. अजयनाथ थोरे, सहायक आयुक्त, तालुका पशु चिकित्सालय, कोपरगाव.