श्रीगोंदा : घोड धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आणखी दोन आवर्तन मिळणार आहेत. पहिले २७ मार्च तर दुसरे आवर्तन १० मे रोजी सोडण्याचा निर्णय मंगळवारी कालवा सल्लागार समितीच्या ऑनलाईन बैठकीत झाला.
या बैठकीतील चर्चेत आ. बबनराव पाचपुते, आ. रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी सहभाग घेतला होता. घोड धरणातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. याबाबत दोन दिवसांपूर्वी घनश्याम शेलार यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते.
घोड धरणातून घोड नदीवरील सहा बंधाऱ्यांत पाणी सोडण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, हा चेंडू जलसंपदामंत्र्यांकडे टोलविण्यात आला. घोड नदीवरील सहा बंधाऱ्यांत ३०० एमसीएफटी पाणी सोडण्यासंदर्भात दोन दिवसांत प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी जलसंपदामंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
--
कुकडीचा पाणीप्रश्न ऐरणीवर
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मे महिन्यात शेतीसाठी दुसरे आवर्तन मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, डिंभे धरणातून येडगाव धरणात पाणी पूर्ण दाबाने येत नाही. सध्या येडगाव धरणात पाणी शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनाचा प्रश्न गंभीर होणार आहे. यासाठी डिंभे धरणातून दाेन व पिंपळगाव जोगे धरणातील मृत साठ्यातून दोन टीएमसी पाणी सोडण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली तर कुकडीचे एक आवर्तन मे महिन्यात सुटू शकते. मात्र, तशा हालचाली न झाल्यास कुकडीच्या पट्ट्यातील पिके जळून जातील.
---
अधिकाऱ्यांना सूचना
दोन्ही आवर्तनांचे नियोजन योग्य पद्धतीने व वेळेत करावे, अशा सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या आहेत, असे आ. बबनराव पाचपुते यांनी सांगितले.