कर्जत (अहमदनगर) : कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील मुंबईवरून परतलेल्या माय-लेकाला ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या दोघांनी नगरच्या सरकारी रुग्णालयातूनही धूम ठोकली होती. परंतु ग्रामस्थांंनी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना कोरोनाचे लक्षणे नसल्याचे डॉक्टरांंनी सांगितले.कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील एक कुटुंब मुंबई येथे व्यावसायिक म्हणून स्थायिक झाले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्याने हे कुटुंब सोमवारी गावी आले होते. त्या कुटुंबातील ६२ वर्षांची महिला आणि तिचा ४० वर्षीय मुलगा होता. ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून त्यांना अगोदर तपासणी करा. मगच गावात प्रवेश मिळेल? असे बजावले. मात्र त्याचवेळी त्या दोघांना ताप, जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. यावेळी ग्रामस्थ एकत्र जमले. मात्र कोरोनामुळे त्या दोघांना हात लावायची कुणाची हिम्मत होईना. अखेर नगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. मात्र मंगळवारी सकाळी त्या दोघांनी धूम ठोकीत पुन्हा बेलगाव गाठले. ही बातमी गावक-यांच्या कानावर गेल्यानंतर मात्र ग्रामस्थ संतापले. अखेर त्या दोघांना आज पुन्हा अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेने मिरजगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.
‘त्या’ दोघांना प्रथमदर्शनी कोरोनाबाबत लक्षणे आढळून आलेली नाहीत. तो दुसरा व्याधींचा प्रकार असावा. मात्र खबरदारी म्हणून सदर महिला व तिच्या मुलाला नगर येथे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.-डॉ संदीप पुंड, तालुका आरोग्यधिकारी, कर्जत.