कोपरगाव (जि. अहमदनगर) : भावास मारहाण का केली? अशी विचाणा करणाऱ्यास कोयत्याने मारहाण करून गावठी कट्ट्यातून गोळी झाडणाऱ्या दोन आरोपींना शुक्रवारी रात्री कोपरगाव शहर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये पकडले. दोघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि. १३ नोव्हेंबर रोजी तुषार माहाले यांच्या भावास आरोपी दत्तु साबळे, राहुल शिदोरे, चेतन शिरसाठ, सिध्दार्थ जगताप यांनी मारहाण केली होती. आपल्या भावास मारहाण का केली? असे विचारले, त्याचा राग आल्याने १३ नोव्हेंबरलाच रात्री साडेअकरा वाजता निवारा भागातील डॉ. झिया हॉस्पिटल समोर दत्तु साबळे, राहुल शिदोरे, चेतन शिरसाठ, सिध्दार्थ जगताप यांनी तुषार माहाले यास मारहाण करण्यास सुरूवात केली. तुषारला मारहाण करून कोयते उगारले, एकाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली होती. 'तु जर पोलिसांत तक्रार दिली, तर तुझी गेम करू' अशी धमकीही त्यांनी दिली. त्यानंतर चौघे तेथुन पसार झाले होते.
या प्रकरणात तुषार महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुल शिवाजी शिदोरे (रा. गोकुळनगरी, कोपरगाव, दत्तु शांताराम साबळे (रा. निवारा कॉर्नर, कोपरगाव), चेतन सुनिल शिरसाठ (रा. टाकळीनाका, कोपरगाव), सिध्दार्थ प्रकाश जगताप (रा. टाकळीनाका, कोपरगाव) व त्यांच्या इतर साथीदार यांचे विरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि ३०७, ३२३, ५०६, ३४, आर्म ॲक्ट ३-२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोकॉ गणेश काकडे, पोकॉ राम खारतोडे, संभाजी शिंदे, बाबासाहेब कोरेकर, पोकॉ. यमनाजी सुंबे, महेश फड यांचे पथक तयार केले. या पथकाने नाशिक, अहमदनगर व इतरत्र जाऊन शोध घेतला परंतु आरोपी हे सापडले नव्हते.
४ डिसेंबर रोजी रात्री गुन्ह्यातील आरोपींपैकी दोघे सिन्नर येथे एका हॉटेलमध्ये असल्याची गोपनीय माहीती पथकाला मिळाली. हे पथक सिन्नर येथे जावुन हॉटेल मधुन चेतन शिरसाठ, सिध्दार्थ जगताप यांना ताब्यात घेतले.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडुन गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे. इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी सांगितले. पुढील तपास पोसई रोहीदास ठोंबरे हे करीत आहेत.