केडगाव : नगर तालुका सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या निवडणुकीचे ढोल वाजले आहेत. येत्या ३० तारखेला मतदान होणार आहे. दोन जागा बिनविरोध झाल्या असून १३ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १८ वर्षानंतर तालुका दूध संघाची निवडणूक होत आहे.जिल्हा दूध संघाच्या विभाजनानंतर नगर तालुका दूध संघ अस्तित्वात आला. यामध्ये २ कोटींचा आर्थिक असमतोल होऊन संघातील घोटाळा उघडकीस आला. यानंतर २००५ मध्ये तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. दूध संघावर प्रशासक नेमण्यात आला. संघाच्या १५ संचालक मंडळासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी ३० आॅक्टोबरला निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी ३७ मतदार प्रतिनिधी आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. यात इतर मागासवर्गीय गटातून गोरख काळे व भटके विमुक्त जाती गटातून गोरक्षनाथ पालवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरीत १३ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वसाधारण गटासाठी : रोहिदास कर्डिले, रामदास शेळके, केशव बेरड, भाऊसाहेब काळे, गोरख सुपेकर, मोहन तवले, राजाराम धामणे, शत्रुघ्न खरपुडे, मधुकर मगर, जालिंदर कुलट, गुलाब कार्ले, राजाराम नरवडे, बजरंग पाडळकर, बाळासाहेब पंडित, भिमराज लांडगे, उद्धव अमृते, किसन बेरड हे उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जाती-जमाती गटातून स्वप्नील बुलाखे, सुनील ननवरे, तर महिला गटातून सविता दौड, पुष्पा कोठुळे व वैशाली मते या रिंगणात राहिल्या आहेत.
नगर दूध संघाच्या दोन जागा बिनविरोध; १३ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 5:34 PM