घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मंगळवारी पहाटे दोन दुकाने फोडली. कृषी औषधाचे दुकान फोडून चोरट्यांनी खते, कीटकनाशके यांसह सुमारे वीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर दुसºया घटनेची किराणा दुकान फोडून दहा हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घारगाव परिसरात सचिन बबन कसबे (वय ३१, रा.खंदरमाळ) यांचे गुरुदत्त कृषी उद्योग नावाचे खते, औषधाचे दुकान आहे. सोमवारी रात्री त्यांनी आठ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद केले.मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. रोख रकमेसह खताच्या गोण्या, कीटकनाशके ,बुरशीनाशक औषधे असा एकूण सुमारे वीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. मंगळवारी सकाळी कसबे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.ए.लांघे हे करीत आहेत. दरम्यान , दिलीप थोरात यांचेही लक्ष्मी किराणा दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून नऊ ते दहा हजारांचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरात दुकान फोडल्याची ही दुसरी घटना आहे.
घारगावात दोन दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:28 PM