अहमदनगर : महापालिकेच्या वतीने सावेडीतील अमरधामजवळील जागेत उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या असून, निविदांची छाननी करून कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे. हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.
महापालिकेच्या वतीने सुमारे दीड कोटी रुपये खर्चून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सावेडी अमरधाम येथील दहा गुंठे जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मनपाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी मनपाने ऑनलाईन निविदा मागविल्या होत्या. गुरुवारी निविदा उघडण्यात आल्या. नाशिक व बंगलोर येथील संस्थांची प्रत्येकी एक अशा दोन निविदा ऑक्सिजन प्रकल्पासाठी प्राप्त झाल्या आहेत. मनपाकडे सादर झालेल्या ऑनलाईन निविदांची छाननी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिवस १२५ जम्बो सिलिंडर इतकी असणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासते. मागील एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. शहरासह जिल्ह्याला दररोज ६० मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज होती; परंतु शासनाकडून विविध प्रकल्पांतून ४० ते ४६ मेट्रिक इतकाच ऑक्सिजन उपलब्ध होत होता. जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्या धर्तीवर महानगरपालिकेने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत आहे.
...
ऑक्सिजनच्या १३५ बेडसाठी दोन निविदा
महापालिकेच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतनसह जैन पितळे बोर्डिंग कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने ऑनलाईन निविदा मागविल्या होत्या. या कामासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या असून या दोन्ही सेंटरमध्ये १३४ ऑक्सिजनच्या बेडची सोय केली जाणार आहे.