केडगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भीतीदायक वातावरण झालेल्या केडगावला मे महिन्यात चांगलाच दिलासा मिळाला आहे. गेल्या चार महिन्यात दोन हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत मागील महिन्याच्या तुलनेत तिपटीने घट झाली असून केडगावात आतापर्यंत ११ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्च व एप्रिल महिना केडगावकरांसाठी खूपच चिंताजनक व भीतीदायक ठरला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केडगावमधील बहुतांश भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला होता. मात्र मे महिन्यात केडगावकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात केडगावमधील रुग्णसंख्या १ हजार ८८९ इतकी झाली होती. त्यात मे महिन्यात घट झाली आहे. या महिन्यात केडगावात ५५५ इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यातील ४१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ११३ इतके सक्रिय रुग्ण उरले आहेत. गेल्या चार महिन्यात केडगावमध्ये २ हजार ४४४ इतक्या रुग्णांची नोंद झाली. यातील २ हजार ६५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
केडगावमध्ये आतापर्यंत १० हजार ७१२ नागरिकांच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महापालिकेचा लॉकडाऊन आणि नागरिकांनी पाळलेली स्वयंशिस्त यामुळे केडगावमध्ये रुग्णसंख्येत आता घट झाली आहे. सध्या दररोजच्या बाधितांची संख्या दहाच्या आत आली आहे.
कोविड सेंटर ठरले वरदान
केडगाव येथे बॉस्को ग्रामीण संस्था व शिवसेनेच्यावतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. बॉस्को सेंटरमधून ३६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत सध्या तेथे फक्त २१ रुग्ण आहेत. शिवसेनेच्या कोविड सेंटरमधून ४३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. हे दोन्ही कोविड सेंटर गोरगरीब रुग्णांना वरदान ठरले.
-------------
केडगावची सद्य:स्थिती
( आकडेवारी फेब्रुवारी ते मे )
एकूण रुग्ण - २४४४
बरे झालेेले रुग्ण - २०६५
सक्रिय रुग्ण - ११३
-------------------------
लसीकरण-
पहिला डोस-७४८४
दुसरा डोस-३२२८
एकूण लसीकरण-१०७१२
------------------------
सध्या केडगाव परिसरात कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट झाली आहे. महापालिकेचे आयुक्त व उपायुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरत सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. वेळेनुसार कठोर निर्णय घेतले. त्यामुळे केडगाव बरोबरच शहराचीही रुग्णसंख्या कमी झाली.
- गिरीश दळवी, आरोग्य अधिकारी, केडगाव केंद्र