श्रीगोंदा : दौड शहरातील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक ७ मधील आठ जवान कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दौंड शहरापासून पाच किलोमीटर अंतरातील बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील निमगाव खलू व गार या दोन गावांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी १४ दिवस हा परिसर शनिवारपासून लॉक करण्यात आला आहे. उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते, तहसीलदार महेंद्र महाजन, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी शनिवारी दुपारी निमगाव खलु व गार ला भेट दिली. यावेळी तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, उपस्थित होत्या. बैठकीत या गावांना आरोग्यसेवा व मदत कशी करता येईल याचा आढावा घेण्यात आला. कौठा, खोरवडी बंधा-यावरून होणारी वाहतूक बंद केली आहे. गार-दौड ही नावेची वाहतूक बंद केली आहे. दौडला कोणत्याच कामासाठी जाऊ नये, अशी दवंडी देण्यात आली आहे. काष्टी, श्रीगोंदा येथील डॉक्टरांनी दौडला रुग्ण पाठवू नये. चेक पोस्टवर कडक तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. घराच्या कोणी पडू नये, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रकाराची मदत प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. सेवाभावी संस्थांनी मदत तहसीलदारांकडे जमा करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील दोन गावे बफर झोनमध्ये; १४ दिवसासाठी लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 2:09 PM